भेटीचे अचूक टाइमिंग ; पॉवर पॉलिटिक्सचे संकेत?


सोलापूर:
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची नुकतीच झालेली भेट जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. अधिकृत स्तरावर ही भेट सामाजिक विषयांवरील चर्चेसाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी तिच्या अचूक टाइमिंगमुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळताना दिसत आहेत.

मागील काही महिन्यांत विरोधकांकडून झालेल्या टीका-टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे का? की भविष्यातील सत्तासमीकरणांच्या हालचालींची ही केवळ सुरुवात आहे? राजकीय वर्तुळात या शक्यतांवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील हे नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकांतील उल्लेखनीय कामगिरीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरही त्यांची ताकद अधोरेखित झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील विकास निधी, प्रशासकीय समन्वय आणि राजकीय समतोल या मुद्द्यांवर निर्माण झालेल्या तणावाची चर्चा उघडपणे होऊ लागली आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यांमुळे निधीवाटपाबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे, अशी भावना जिल्ह्यातील काही घटक व्यक्त करीत आहेत. विकासकामांमध्ये अडथळे येतील का, निधी समानतेने मिळेल का, या प्रश्नांनी सामान्य जनतेतही कुतूहल आणि चिंता निर्माण केली आहे.
याच पार्श्वभूमीवर झालेली शिंदे-मोहिते पाटील भेट ही केवळ सौजन्यभेट मानावी की जिल्ह्याच्या हितासाठी उच्चस्तरीय राजकीय संवादाचा भाग समजावा, हा कळीचा प्रश्न आहे. काहींच्या मते, ही भेट म्हणजे दबाव तंत्राला दिलेले सौम्य पण ठोस उत्तर आहे; तर काहींच्या मते, आगामी राजकीय समीकरणांची चाहूल देणारी चाल आहे.

सोलापूर जिल्ह्यात वाढत चाललेल्या राजकीय तापमानाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. सत्ता, विकास आणि जिल्ह्याच्या राजकीय स्वाभिमानाच्या मुद्द्यांभोवती फिरणारे हे समीकरण पुढील काळात कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.भेटीचे

  
थोडे नवीन जरा जुने