सोलापूर:आई नसलेल्या अज्ञान पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या लक्ष्मण विठ्ठल शिंदे (वय ३०, रा. मोहोळ) याला सोलापूरचे जिल्हा न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. डीएनए (DNA) अहवाल या खटल्यात सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील रहिवासी असलेला आरोपी लक्ष्मण शिंदे हा पीडितेच्या घराच्या पाठीमागेच राहत होता. पीडितेच्या घरातील सर्व सदस्य एका कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना, पीडिता घरी एकटी असल्याचे पाहून आरोपीने दुपारी २ च्या सुमारास घरात प्रवेश केला. त्याने घराला आतून कडी लावून पीडितेच्या विरोधाला न जुमानता तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, ही घटना कोणाला सांगितल्यास 'जीवे ठार मारू' अशी धमकी दिली.
धमकीमुळे पीडितेने काही दिवस कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, काही दिवसांनी तिला उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. या धक्क्यातून सावरत आजीने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने लक्ष्मण शिंदे याने केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास करणारे अंमलदार एपीआय राठोड यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.DNA अहवालानुसार पीडितेचा गर्भ आणि आरोपीचा डीएनए अहवाल जुळल्यामुळे सरकारी पक्षाचा युक्तिवाद भक्कम झाला. तसेच साक्षीदार पीडिता, तिची आजी आणि डॉक्टर यांच्या साक्षी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.
सरकारी वकील ॲड. शीतल डोके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली भादंवि कलम ३७६(२)(एन) व पॉक्सो कलम ४ आणि ५ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंड. भा.दं.वि कलम ५०४ व ५०६: १ वर्ष सक्त मजुरी.या कामी सरकार पक्षातर्फे ॲड. शीतल डोके आणि ॲड .पी. एस. जन्नू यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार व लेडी कॉन्स्टेबल काळे यांनी मदत केली.
Tags
क्राईम


