उंबरे प्रतिनिधी : महेश नरसाळे
सोलापूर: उंबरे (पागे) : विद्या विकास मंदिर व कर्मवीर सुधाकरपंत परिचारक कनिष्ठ महाविद्यालयात मकर संक्रांतीचे औचित्य साधून मातापालकांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळा व मातापालकांमध्ये सुसंवाद वाढविणे, पालकांना मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हे या उपक्रमामागील उद्दिष्ट होते.
मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जाणीवेबद्दल पालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थी–शिक्षक–पालक यांच्यात मजबूत नाते निर्माण व्हावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. समारंभात मुख्याध्यापक शहाजी पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “माता ही विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सुसंवाद वाढविणाऱ्या प्रमुख दुव्यांपैकी एक आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत त्यांच्या आरोग्याकडेही मातांनी लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
माता नेहमीच आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्याचा प्रयत्न करीत असतात.” कार्यक्रमाला परिसरातील महिलाभगिनी, विद्यार्थिनी व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. मोनाली ढोबळे उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी शेवंताबाई ढोबळे यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक शहाजी पाटील, शिक्षिका उर्मिला बुगड, सुप्रिया पाटील, अपर्णा जोशी, पूजा रजपूत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


