पालखी सोहळ्यास पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्त्रोतांची तपासणी करावी - प्रांताधिकारी गजानन गुरव

 


पंढरपूर: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज तसेच अन्य संताच्या पालख्याबरोबर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक येतात. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहरात व परिसरात स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी  मिळावे यासाठी पालखी मार्गावरील तसेच शहरातील पाणीपुवठा करणाऱ्या जल स्त्रोतांची तपासणी करावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग तसेच शहरातील पाणीपुरवठा व्यस्थापनाबाबत प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, महावितरणचे कार्यकारी अभियंता बी.ए.भोळे तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.    

 यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव म्हणाले,  पंढरपूर तालुक्यात  पालखी मार्गावर 719 जलस्त्रोत व टॅकर भरण्यासाठी 12 ठिकाणे निश्चित करण्यात आली  आहेत. तसेच आषाढी यात्रा कालावधीसाठी  मुबलक पाणी पुरवठा यासाठी पंढरपूर शहर व परिसरात 36 बोअरवेल, 50 हातपंप,   टॅकर भरण्यासाठी दोन ठिकाणे व 65 एकर येथील पाणीपुरवठा व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. 

या सर्व ठिकाणच्या जलस्त्रोतांची तपासणी करावी तसेच ज्या ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य अशा ठिकाणी ठळक माहिती फलक लावावेत. पालखी मार्गावरील टँकर भरण्याच्या ठिकाणी  कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी रस्ता दुरुस्ती  करावी. महावितरण विभागाने पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या स्त्रोतांचा विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता घ्यावी. पाण्यात क्लोरिनचे योग्य प्रमाण राहिल याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, असेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.

तसेच वारी कालावधी पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या टँकरना वाहतुकीस अडथळा येणार नाही याबाबत वाहतुक नियोजन करावे. पाटबंधारे विभागाने वारी कालावधी नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही प्रांताधिकारी श्री.गुरव यांनी यावेळी दिल्या. यावेळी आषाढी यात्रा कालावधीत  भाविकांना तसेच शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होण्यासाठी नगरपालिकेकडून आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचे मुख्यधिकारी अरविंद माळी यांनी यावेळी सांगितले.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈

थोडे नवीन जरा जुने