साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव, दि.२ फेब्रुवारी- महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान, तत्वज्ञान रूजविणार अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. राज्याचा सर्वांगिण विकासाबरोबर साहित्य, कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाईल. साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नये, याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. मराठी साहित्य संमेलनास गौरवाशाली परंपरा आहे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. प्रताप हायस्कूलमध्ये सानेगुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते. साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक झाले पाहिजे. अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आज उद्घाटन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. उद्घाटक म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उद्योजक अशोक जैन, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, समन्वयक नरेंद्र पाठक, साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने